काळाच्या दोन बांधांमधली ‘नांगरणी’ ●°°●

तसं पहायला गेलं तर नांगरणीवर लिहावं अशी परिस्थिती सध्या नाही. चहुबाजूंनी संकटाच्या कुंभगर्त्यात सापडलेल्या शेती नावाच्या व्यवसायाचं भीषण रूप आज आपल्याला आपल्याच आभासी जाणिवांपुढे कफल्लक वाटतं. म्हणूनच, त्यावर लिहायला जावं तर कदाचित सैरभैर होण्याचीच शक्यता अधिक. अशावेळी मग लेखनथांबा घेऊन उघड्या डोळ्यांनी ‘भवताल’ वाचत राहणं केव्हाही संयुक्तिक असतं. असा वाचनप्रपंच सुरु असताना कधीकधी नवीन धागे गवसतात. त्यातून होणारं शिवणकाम मात्र आपल्याही नकळतपणे जाणिवांना अंतर्बाह्य समृद्ध करून टाकतं. नवजाणिवांचा आविष्कार झालेल्या मनाला अशावेळी व्यक्त करणं अगदीच क्रमप्राप्त होऊन बसतं.
असो.
तर मागे एकदा कॉलेजच्या स्नेहसंमेलनात संकर्षण कऱ्हाडे नावाच्या एका मराठी अभिनेत्यानं त्याच्या वाचनप्रवासावर बोलताना आनंद यादवांच्या ‘झोंबी’ आणि ‘नांगरणी’ अशा दोन आत्मचरित्रपर पुस्तकांचा संदर्भ दिला होता. त्यातलं ‘नांगरणी’ आज एका बैठकीत वाचून संपवलं. दहावी पार केलेल्या आणि सध्या कॉलेजात शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचावं, असं हे पुस्तक.

आपल्या कुणबी आईवडिलांचा शिक्षणासाठीचा विरोध झुगारून एसएससीनंतरचं शिक्षण घेण्यासाठी लेखक कागलहुन थेट रत्नागिरीला पळून जातो. तिथं विनोबांच्या भूदान चळवळीतून उभारलेल्या छात्रालयात त्याची विनाशुल्क रहायची आणि खायची सोय होते. तिथल्याच कॉलेजात ऍडमिशन घेऊन मेहनतीनं शिक्षण घेतो. छात्रालयात राहत असताना तिथल्या सर्वोदयी जीवनमूल्यांमुळे तो वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनत जातो. मात्र अगदी काही दिवसांतच सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या वागण्यातील विरोधाभासही त्याच्या लक्षात येतो. विनोबांच्या उदात्त विचारांनी प्रेरित सर्वोदयाच्या मूलभूत तत्वांना काळिमा फासणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या विरोधाभासी वागण्याने त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो; तो कायमचा !
पुढे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनकौशल्यामुळे पु.लं देशपांडेंशी त्याची ओळख होते. पु.लंच्या ओळखीने कोल्हापुरात चांगल्या कॉलेजात शिकायची आणि शाहू महाराजांनी काढलेल्या प्रिन्स शिवाजी बोर्डिंगला रहायची सोय होते. हळूहळू आकाशवाणीवर त्याचे कार्यक्रम सादर होऊ लागतात. त्यातून पैसे मिळू लागतात. हाफ फ्रीशीप असल्याने बोर्डिंगची राहिलेली फी भरायची सोय त्यामुळे होते. एव्हाना घरच्यांचा त्याच्या शिक्षणास असलेला विरोध मावळलेला असतो. असं कर करत पदवीचं शिक्षण पूर्ण होतं. एम. ए ला असताना आकाशवाणीत नोकरी लागते. आणि तिथंच बांध लागून नांगरणी थांबा घेते.

सचोटीने काम करणाऱ्याला कुठलीच अडचण फार काळ रोखू शकत नाही, असं म्हणतात. तसंच काहीसं लेखकाच्या बाबतीत घडलेलं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणारी नवनवीन आव्हानं परतवून पुढं दौड मारत राहणं हाच खरा पुरुषार्थ असतो, ही विजिगीषु वृत्ती पुस्तकात पानोपानी आढळते.
आपल्या एकांड्या शैक्षणिक प्रवासाशिवाय लेखकाने 50 च्या दशकाचा ठावही या पुस्तकातून घेतला आहे. हे सगळं शब्दबद्ध करत असताना त्यानं त्यावेळच्या ग्रामीण ते राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवरही तितक्याच ताकदीनं भाष्य केलं आहे. लेखकाचे अनुभव वाचताना स्वतःला त्याच्याशी पदोपदी रिलेट करायचा मोह आवरत नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी स्वतःची तुलना केल्यानंतर आजचा भवतालही तेव्हाच्या परिस्थितीला जोडून पहावासा वाटतो. काळाच्या या दोन बांधांना सांधलं की मग साठ वर्षांत घडलेला गुणात्मक बदल आपल्याला लक्षात येतो. अनेक समाजराजकीय प्रश्नांची उत्तरं विनासायास मिळतात. प्रश्नोत्तरांचं हे चर्हाट अर्थातच सदोदितपणे सुरू राहतं.

कारण त्याला नांगरणीच्या मर्यादा नसतात, इतकंच.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.