थेट पर्यावरणाच्या दरबारातून…!

लहान असताना गावच्याच दुकानातून किरकोळ किराणा सामान आणायला जाण्यात एक वेगळीच मजा असायची. तेव्हा दैनंदिन सामानवजा वस्तू रद्दी पेपरात भरून वितरित केल्या जात असत. गोडतेलासाठीसुद्धा घरूनच स्टीलची कॅन सोबत न्यावी लागत असे. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर अगदीच जुजबी म्हणावा असा…निव्वळ गरजेपुरता! पॅकेजिंग केलेल्या वस्तू अत्यंत तोकड्या प्रमाणात दाखल होऊ लागलेल्या. मात्र दिवस बदलत गेले. बदलणाऱ्या दिवसांगणिक आमचा भवतालही कधी बदलला; कळलंसुद्धा नाही. औरंगाबादेत राहिल्यामुळे हा बदल जाणवायला तसा फार वेळ लागला नाही. ‘गार्बेज सिटी’ म्हणून लौकीकास पावलेल्या या शहरात भर वस्त्यांमध्ये साचलेला कचरा पाहण्याची तर सवयही झाली होती. परंतु प्लास्टिक कचऱ्याचं हे लोण महामार्गाच्या दुतर्फा पोचलेलं पाहून फार वाईट वाटलं. नगर-पुणे असा प्रवास करताना महामार्गाच्या दोन्ही बाजूंना बऱ्याच अंतरापर्यंत तुम्हाला प्लास्टिक कचऱ्याची राळ उडालेली दिसेल. हे सगळं जवळून पाहिल्यावर समोर उभं राहतं ते तुमच्या आमच्या जगण्यातील विसंगती नावाचं किळसवाणं बायप्रॉडक्ट! ही विसंगती आपल्यात नेमकी जन्मली तरी केव्हा? असा प्रश्न स्वतःलाच विचारल्यावर बऱ्याच प्रश्नांची उकल होत गेली.

मुळात प्लास्टिकच्या आणि एकूणच अनावश्यक वस्तूंच्या अतिरेकी वापराचा संबंध आपल्या ‘विकत घ्या’ प्रवृत्तीत दडलेला आहे; जी आज ‘कंज्युमरीजम’ म्हणून जगभर ओळखली जात आहे. जागतिकीकरण झालं आणि आपल्या आधुनिकतेच्या संकल्पना अल्पावधीतच बदलल्या गेल्या. प्रचंड गुंतवणूक, भरमसाठ उत्पादन, वाढत गेलेलं उत्पन्न, मार्केटिंगच्या नवतंत्राने जनसामान्यांना घातलेली भुरळ आणि सरतेशेवटी बदलत गेलेल्या सामाजिक संकल्पना हे सगळं इंटरलिंक केलं तर आपल्या सामाजिक बदलांचं ओंगळवाणं रूप समोर येतं. याला आपली उपभोगवादी समाजव्यवस्था बहुअंशी जबाबदार. शेजाऱ्याकडे जे आहे ते माझ्याकडे असायलाच हवं, यासाठीचा अमर्याद हट्ट. त्या हट्टासाठीच जगणं लागावं, इतकी त्याची तीव्रता. तो मात्र काही केल्या संपत नाही. त्याला फोडणी आहे ती परत एकदा सोशल मीडियाचीच. यातून उदभवणारे सामाजिक प्रश्न इथे लिहायला गेलो तर स्वतंत्र निबंधच तयार होईल, अशी एकूण परिस्थिती.

कुठलीही गोष्ट मर्यादेत असायला हवी हा नैसर्गाचा बेसिक मापदंड. गांधीजींच्याच भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणता येईल…’गरजा जेव्हा हावरटपणात बदलतात; तेव्हा अवघं वैश्विक संचित तोकडं पडू लागतं’. या सगळ्या अट्टहासापायी आपण समाज म्हणून नेमकं कुठे चाललो आहोत, असा विचार केल्यावर समोर दिसते ती फक्त पर्यावरणाची चाळण! आपल्या हावरटपणाची भूक भागवण्यासाठी होत असलेला ऊर्जेचा अतिरिक्त वापर, कार्बनचं अमर्याद उत्सर्जन आणि त्यातून होणारी जागतिक तापमानवाढ. हे कमी म्हणून की काय, तापमानवाढीच्या सोबतीला वितळणारा ध्रुवीय बर्फ आणि याच परिणामांती अविरतपणे वाढत असलेली समुद्रजलपातळी. अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ याबद्दल तर बोलायलाच नको. ‘रोजचंच मढं…’ असं त्यांचं स्वरूप. तेही केवळ आपल्याच दुष्कृत्यांमुळे!

असो.
तर ठरलेला ब्लॉग लिहून झाल्यावर जेव्हा खारीक आणण्यासाठी किराणा दुकानात गेलो तर दुकानदाराने त्याच्या सवयीप्रमाणे प्लास्टिकच्या कॅरीबॅगेत (इथे प्लास्टिक बंदी कोण जुमानतो?) घालून पाव किलो खारीक पुढे सरकवली. रद्दीच्या कागदात भरून द्या, अशी विनंती केली तर त्याने कसनुसं स्माईल देऊन प्रश्न केला.
“का बरं..?”

जर या “का?” चं उत्तर आपण वेळेत द्यायला शिकलो तर येणाऱ्या पिढ्यांच्या कित्येक “का?” पासून वाचता येईल, हेही तितकंच खरं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.