लेणी, लेणापूर आणि ती जाहिरात..!

मागे एकदा इंजिनियरिंगला असताना अजिंठा लेणी पहायला गेलो होतो.
तब्बल निम्मं तप औरंगाबादेत राहूनही तू अजिंठा लेण्या पाहिल्या नाहीस, असं म्हणत कोणी आपल्याला वेड्यात काढू नये म्हणून अचानकच प्लॅन बनवलेला. सोबतीला चार पाच सवंगडी होते. मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी पकडून लवकरच अजिंठा गाठला. तिकीट वगैरे काढून लेण्यांच्या दिशेने निघालो. अवतीभवतीच्या परिसरात झालेली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पाहिल्यावर औरंगाबादच्या इतकं जवळ असूनही एखादं पर्यटनस्थळ इतक्या सुरेख पद्धतीनं जपलेलं असू शकतं, यावर बराच वेळ विश्वास बसत नव्हता. मी आपला विचार करतोय तोच समोर सिक्युरिटी चेकपोस्ट लागला. सोबत असलेल्या बॅगसोबत आम्हा सर्वांचीच झाडाझडती घेऊन झाली. थोड्याच वेळात यथावकाश लेण्याही पाहून झाल्या होत्या. परंतु परतीला लागण्यास बराच वेळ शिल्लक होता. आता बरे काय करावे(?) याचा विचार करत असताना समोर दिसणाऱ्या हिल पॉईंट वर जायचं ठरवलं. तिकडे जाताना वरच्या डोंगरावरून दरीच्या पायथ्याशी धो धो कोसळणारा धबधबा पाहिला आणि हरखलेल्या मनानिशी पायऱ्यांना बगल देत डोंगरकडा चढून वर पोचलो. वरच्या सपाट मैदानावरुन दिसणाऱ्या लेण्या म्हणजे डोंगराच्या खिडक्याच भासत होत्या. इतकं ते मनोहारी दृश्य! एव्हाना प्रचंड भूक लागली होती. मग काय.. बॅगेतून फरसाण-चिवड्याची पिशवी बाहेर काढून एका पेपरवर रिती केली आणि ताव मारला. पोट भरलं परंतु आता तहान भागवावी लागणार होती. सोबत आणलेलं पाणी तर केव्हाच संपलेलं. मग थोडी शोधाशोध केल्यावर एक ओढा नजरेस पडला. त्याचं खळखळ वाहणारं नितळ पाणी पाहून जीवात जीव आला. गटागटा पाणी ढोसून त्या माळावर घटकाभर आडवे झालो.

इतक्यात दूरवर मेंढ्यांचा कळप आणि त्याच्या थोडंसं पुढं एक वाडी दिसत होती. तिकडं गेलो तर परत यायला खूप उशीर होणार होता. कारण ते ठिकाण लेण्यांच्या प्रवेशद्वाराच्या थेट विरुद्ध दिशेला आणि आमच्यापासून बरंच दूरवर होतं. थोडा विचार करून त्या वाडीला जायचा निर्णय घेतला आणि त्या गावातून सिल्लोडला जायला काहीएक वाहन मिळालं तर त्यानेच पुढचा प्रवास करायचा, असं ठरवलं. वाडीतून वाहन मिळणं हा लेणीच्या मुख्य गेटवर परत जावं लागण्यापेक्षा अगदीच सोयीस्कर असा पर्याय होता. साधारण दुपारीचे तीन साडेतीन वाजले असावेत. आम्ही गप्पा मारत मारत अर्ध्या पाऊण तासात त्या छोट्या वस्तीवर पोचलो.

त्या वस्तीवजा गावाचं नाव होतं लेणापूर. सोयगाव तालुक्यातलं हे छोटंसं गाव पाहून धक्काच बसला. थोड्यावेळापूर्वी आम्ही ज्या अजिंठा लेण्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून हरखून गेलो होतो, त्याच लेण्यांच्या माथ्यावर असणारं हे गाव अगदीच मागास म्हणावं असं होतं. इतक्यात गावच्या चौकात एक दोन तीन म्हातारी माणसं नजरेस पडली. त्यांच्याशी थोड्याफार गप्पा झाल्यावर तिथल्या अडीअडचणी कळल्या. कुलूप अडवलेल्या शाळेबद्दल विचारलं तर कळलं की, गावातील प्राथमिक शाळा शिक्षकाविना केव्हाच बंद पडलीय. शिकायचं म्हणलं तर इथं आसपासच्या एकाही वाडीवर शाळा नाही. थेट तालुक्यालाच जावं लागतं. जी गत शाळेची तीच इतर मूलभूत सुविधांची. या त्यांच्या व्यथा ऐकत ऐकत बराच उशीर होऊ लागला होता. तिथून वाहन मिळणं मुश्कील आहे, असं त्यातल्याच एका आजोबांनी आधीच सांगितलेलं होतं. आता मात्र लेणीच्या मुख्य गेटवर परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून परत एकदा पाणी पिऊन परतीला लागलो.
आताशा गावाबाहेर पडतो न पडतो… तोच पाण्याच्या एका रिकाम्या टाकीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याश्या निवडणूकीची एक जाहिरात नजरेस पडली.
मजकूर होता…
‘…..भरघोस मतांनी विजयी करा’.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.