‘वास्तुपुरुषा’शी भवताल रिलेट करताना ●::●

अभ्यास, आहार आणि आराम असं तीन ‘आ’कारी आयुष्य जगत भविष्याची हस्तलिखितं लिहिणं सुरू आहे हल्ली. त्यात थोडासा फेरबदल म्हणून मग युट्युबवर एखादा आशयघन चित्रपट पाहण्यात येतो रविवारी. मागच्या ब्लॉगमध्ये ग्रामीण शिक्षणव्यवस्थेतील दोषांना भेदून एक रचनात्मक परडाईम शिफ्ट घडवून आणणाऱ्या ‘उबुंटू’ या चित्रपटाबद्दल लिहिण्यात आलेलं. त्यालाही आता जवळपास पंधराएक दिवस होऊन गेले. मध्ये एक रविवारही अस्मादिकांच्या तावडीतून निसटून गेला. मग ‘लेट इट गो’ म्हणत पुढच्या रविवारी लिहू, असं स्वतःशीच ठरवून टाकलेलं. पाहता-पाहता तो ‘पुढचा’ रविवार आलासुद्धा. म्हणून मग लिहायला बसलो तर सुरुवातीलाच प्रश्न पडला, की आज नेमकं कशाबद्दल लिहायचं ? इतक्यात मन:पटलावर ‘वास्तुपुरुष’ उभा ठाकलेला दिसला. मागच्याच रविवारी पाहण्यात आलेला एक क्लासिक मराठी चित्रपट म्हणजे ‘वास्तुपुरुष’.
त्याचं झालं असं, की खूप दिवसांपासून सुनिल सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेला ‘कासव’ (राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट- 2017) पहायची इच्छा होती; परंतु बरीच शोधाशोध करूनही तो कुठे पहायला मिळाला नाही. मग या प्रयोगशील दिग्दर्शक द्वयींचा दुसरा कुठला तरी सिनेमा पाहू असं ठरवलं. त्यात हा ‘वास्तुपुरुष’ (2002) सजेशनमध्ये दिसला. हासुद्धा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट. शिवाय विचारी अभिनेता अतुल कुलकर्णीची भूमिका असल्याने तो पाहण्याचं कारणही मिळालं.
चित्रपटाच्या नावावरून सुरुवातीला असं वाटलं होतं की हा केवळ एक गूढ थरारपट असेल. परंतु पुढे काही मिनिटांत लक्षात आलं, की हा काही तद्दन रहस्यपट नसून एक मल्टीडिमेन्शनल सिनेमा आहे. त्याचे अनेकांगी पदर हळूहळू रिव्हील होत जातात.नवभारतात नुकतीच स्वातंत्र्याची पहाट झालेली. लोकशाहीबद्दल खेड्यापाड्यांत कमालीचं कुतूहल. गांधींजींच्या पश्चात त्यांच्या अस्पृश्यताविरोधी मूल्यांचा अंगीकार करणारं ग्रामीण उच्चवर्णीय नेतृत्व. याचीच परिणीती म्हणून ‘महारवाड्या’चं ‘भीमनगर’मध्ये झालेलं रूपांतर. बाबासाहेबांच्या भरीव योगदानातून ताठ कण्याने उभा ठाकलेला दलित समाज. असं भोवताली एकूणच रोमँटिक वातावरण असताना गांधी-विनोबावादातील आदर्शांवर चालणाऱ्या आपल्या नवऱ्याला वास्तवतेचे चटके देऊन त्यातून बाहेर काढू पाहणारी एक खंबीर उच्चवर्णीय स्त्री.कुळकायद्यात आणि भूदानात गेलेल्या जमिनीमुळे तिच्या वाट्याला आलेली अस्वस्थता. मुलांच्या भवितव्याबाबतची तिची काळजी. यातून आपल्या धाकट्या मुलाच्या उच्चशिक्षणासाठीचा तिचा आग्रह. गोरगरीबांच्या सेवेसाठी त्याला डॉक्टर करण्याचं तिचं असलेलं स्वप्न. हे कमी म्हणून की काय… दिग्दर्शकांनी याला जोडलेली वडिलोपार्जित गुढखजिन्याची किनार. त्यातून निर्माण झालेले प्रश्न. इतकं होऊनही पराकोटीच्या प्रतिकूलतेवर मात करत आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणारा तिचा धाकला मुलगा.आणि सिनेमाचा होणारा ह्रदयस्पर्शी शेवट… हे सगळं एकूणच विचारप्रक्रियेला हँग करणारं होतं.
एक सशक्त सिनेमा म्हणजे नेमकं काय असतं, ते ‘वास्तुपुरुष’ पाहिल्यावर तुम्हाला नक्की कळेल. भंपकपणा आणि आशयघनता यांच्यातला सूक्ष्म फरक जाणून घ्यायचा असेल तर आवर्जून पहावा असा हा चित्रपट.धन्यवाद !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.