‘उबुंटू’च्या शोधात..!

‘उबुंटू’ हा दक्षिण आफ्रिकेत बोलल्या जाणाऱ्या झुलू भाषेतला शब्द. ‘मी आहे कारण आपण सारे आहोत’ असा या शब्दाचा मराठीत मान्यता पावलेला अर्थ. तसं पाहिलं तर मला हा शब्द यापूर्वी माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु २०१७ साली जेव्हा या शीर्षकासोबतचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा उत्सुकता म्हणून मी त्याचं ट्रेलर पाहिलेलं. ते पाहताक्षणीच लक्षात आलं होतं, की हे काहीतरी वेगळं आहे. एखाद्या दिवशी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पाहूया असं ठरवलं; परंतु औरंगाबादेत प्रदर्शित न झाल्यामुळे हा चित्रपट काही पहायला मिळाला नाही. त्यानंतर जवळपास दोन वर्षे सरून गेली. मध्यंतरी तर विसरूनही गेलो होतो. पण मग काही दिवसांपूर्वी तो इंटरनेटवर पहायला मिळाला. बऱ्याच दिवसांनी ग्रामीण प्रश्नावर असा अगदी स्पष्टपणे भाष्य करणारा सिनेमा बघण्यात आला. ग्रामीण प्रश्न म्हटल्यावर त्याला अनेक कंगोरे असतात. शिक्षण हा त्याचाच एक मुख्य धागा. वर्तमान ग्रामीण शिक्षणावर लिहावं बोलावं तेवढं कमीच आहे. असं असताना सिनेमा पाहून झाल्यावर त्यावर ब्लॉग लिहायची इच्छा होणं, हे स्वाभाविकच म्हणावं लागेल. असो.

तर हा सिनेमा मुळात एका खेडे गावातील शाळेवर आधारलेला आहे. बारकाईने पाहिलं तर त्यात शिक्षक, विद्यार्थी आणि गावची कारभारी मंडळी असा त्रिकोण आहे. आता या त्रिकोणाच्या एका बाजूचा दुसऱ्या बाजुशी आणि दुसरीचा तिसरीशी येनकेनप्रकारे काहीतरी संबंध असणार, यात शंका असण्याचं कारण नाही. यावर कडी म्हणून की काय दिग्दर्शकाने हा त्रिकोणी संबंध वास्तवाशी जोडून त्यात एक प्रकारचा रोमांचच उभा केलाय, जणू ! असा त्रिकोणी चित्रपट जेव्हा आपण पाहू लागतो; तेव्हा बऱ्याच गोष्टींची उकल होत जाते. गावची कारभारी मंडळी कमी पटसंख्येमुळे जेव्हा शाळेला कुलूप लावायचा निर्णय गावकऱ्यांसमोर जाहीर करतात; तेव्हा शाळेचा एकमेव शिक्षक आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आपल्या गुरुजींच्या अफलातून अध्यापनकौशल्यावर भाळलेले हे विद्यार्थी सरपंचाच्या या अविचारी निर्णयाचा कडाडून विरोध करतात. यादरम्यान विद्यार्थीप्रिय शिक्षकाला आपल्या पत्नीच्या प्रसूतीसाठी काही दिवसांसाठी बाहेरगावी जायची वेळ येते तेव्हा शाळा बंद न होऊ द्यायची पूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर येऊन पडते.

गुरुजींच्या अचानक रजेवर जाण्यामुळे मागे उल्लेख केलेल्या त्रिकोणाची एक भक्कम बाजू एव्हाना निखळून पडलेली असताना ही लढाई आता विद्यार्थी वि. कारभारी मंडळी अधिक गाव अशी होऊन बसलेली असते. त्यात भर म्हणून कारभाऱ्यांच्या बाजूने शिक्षणाधिकाऱ्यांची भर पडलेली असते. परंतु जीवनमूल्याधारीत शिक्षणाचं बाळकडू पाजणाऱ्या आपल्या गुरुजींच्या शिकवणीतून हे विद्यार्थी अभिनव पद्धतीने शाळा बंद होण्यापासून वाचवतात, तेव्हा ‘उबुंटू’ या शब्दासोबत असलेली डिक्शनरीबाहेरची ओळख अजून गडद होऊन जाते.

‘उबुंटू. मी आहे कारण आपण सारे आहोत !’

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.