विशीतल्या तरुणाईची गोष्ट: भाग २

ग्रामीण भागातील भलेमोठे चिरेबंदी वाडे म्हणजे विसाव्या शतकातल्या जमीनदारीची प्रतीकंच.

अशा वाड्यांमध्ये जेव्हा टेलिफोन अँटेनाज उभे राहू लागले तेव्हा भारताच्या ग्रामीण समाज जीवनात पुन्हा एकदा बदल होऊ घातलेला होता. मात्र असं असलं तरी, नेहमीप्रमाणं या बदलातही अगदी ठळकपणे जाणवणारी सूक्ष्म दरी होतीच. थोडक्यात काय तर ठराविक लोकांच्याच घरी अशा प्रकारची सोय उपलब्ध झालेली. त्या वेळी एखाद्याच्या घरी लँडलाईनची सोय असणं म्हणजे ‘रुरल एलिटनेस’चाच प्रकार होता.

अशा रुरल एलिटनेसची प्रारूपं ही येत्या काळात सतत बदलत राहतील, याची त्यावेळी तसूभरही कल्पना असण्याचं काहीच कारण नव्हतं. मुळात कल्पना असणं म्हणजे नेमकं काय असतं, हेही आमच्या पिढीसाठी तसं अकल्पनीयच. मग ‘चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट’ हे कळणं तर खूप दूरची गोष्ट होती. एकूणच बदलांचे पडघम अव्याहतपणे वाजत असण्याच्या काळात आमची पिढी घडू लागली होती. तिला कशाचीही चिंता असण्याचं काहीएक कारण नव्हतं.

परंतु बाराखडीची ओळख होऊन जेमतेम तीन चार वर्षे उलटली तोच तालुक्याच्या ठिकाणी पहिली ‘इंग्लिश मीडियम स्कुल’ सुरू झाली. हे कानावर पडलं तेव्हा तिसरीच्या वर्गात होतो. अर्थातच एका छोट्याशा खेड्यातील झेडपीच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकत असल्यामुळे स्वतंत्र इंग्रजी माध्यमाची शाळाही अस्तित्वात असू शकते, यावर त्यावेळी खरोखरच विश्वास बसला नव्हता. इंग्रजीचं एकच पाठ्यपुस्तक नाकी नऊ आणत असताना हा ‘इंग्लिश स्कुल’ नावाचा प्रकार म्हणजे आमच्या इंफिअरिटी कॉम्प्लेक्सचं इनसेप्शनच होतं.

त्यावेळी गावातील मोजक्या लोकांनी आपल्या लहानग्या मुलांना इंग्लिश स्कुलमध्ये ऍडमिशन घेऊन दिलेली. अर्थातच ही मुलं आम्हाला ज्युनिअर होती. असं असूनही त्यांचं रोज सॉक्सबुटात शाळेला जाणं, वेल प्रेस्ड कपडे घालून शर्टच्या कॉलरात करकचून नेकटाय बांधणं, आणि वह्यापुस्तकांनी भरगच्च भरलेली दप्तरं पाहून इंग्लिश स्कुल नावाच्या प्रकाराचं सतत अप्रूप वाटायचं. याशिवाय यांना दररोज शाळेत घेऊन जायला आणि परत सोडायला गावात ‘स्कुलबस’ येते, हे पाहून तर आम्हाला आमचीच कीव यायला लागली होती.

एकूणच काय तर त्यावेळी उभ्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात हे इंग्लिश स्कुलचं पीक जोमानं वाढायला सुरुवात झाली होती. शटर वर ढकललं की, त्यापलीकडे इंग्रजी शाळांचं एक भेसूर रूप दिसायला लागायचं. मोठ्या शहरांतली गोष्ट वेगळी होती. तिथल्या प्रोफेशनल अट्रिब्युट्समुळे या बदलाचं प्रारूप खूप वर्षांपूर्वीच यशस्वी झालेलं होतं. परंतु महाराष्ट्राचा ग्रामीण भाग मात्र या बदलाला बेगडी आत्मसमाधानासाठी स्वीकारू पाहत होता. आपल्या मुलाला तालुक्याच्या ठिकाणी इंग्लिश शाळेत शिकायला घातलं तर चारचौघात आपली पत वाढेल, असं काही मोजक्या आणि काहीश्या विचारशून्य पालकांना वाटत असावं, बहुदा. अशा आततायीपणातून निरागस, कोवळ्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हाती काय आलं, हा आजही एक संशोधनाचाच विषय आहे.

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.