विशीतल्या तरुणाईची गोष्ट: भाग 1

विसाव्या शतकात प्रकट झालेल्या कैक पिढ्यांतील शेंडेफळ म्हणजे नव्वदच्या दशकात अवतरलेली आमची ‘पोस्ट खा.उ.जा’ पिढी. आता हा खाउजा काय नवीनच प्रकार(?) असं त्या व्हॉट्सऍप इमोजीसारखं तोंड करून तुमच्यापैकी बव्हंशी लोक्स विचारतील, याची मला पूर्वकल्पना आहेच. परंतु त्यातील बरेच जण गूगल करून तिचा माग लावतील, अशी लिटरभर खात्रीदेखील आहे.
असो.
तर ही ‘पोस्ट खाउजा’ पिढी आता ग्रॅज्युएट होऊ पाहत आहे. लौकिकार्थाने ती आता तरुण बनली आहे. असं असताना त्यांना रिलेट करेल असं काहीतरी लिहावं, अशी खूप दिवसांपासून इच्छा होती. अर्थात हे लिहिणं एका ब्लॉगपोस्टमध्ये संपणारं निश्चितच नाही, हे माहीत होतं. म्हणूनच दर रविवारी ‘विशीतल्या तरुणाईची गोष्ट’ या टायटलसोबत लिहायचं ठरवलं आहे. थोडक्यात एका नवीन ब्लॉगसीरिजची सुरुवात करत आहे. असेच वाचत रहा.

तिकडे नव्वदच्या दशकात खाजगीकरण, जागतिकीकरण, आणि उदारीकरण या शासकीय धोरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अगणित बदलांचे वारे वाहू लागले. एकूणच सरकारी लेटलतीफ कारभाराची सवय झालेल्या भारतीय जनमानसासाठी हा प्रकार अंतर्बाह्य नवीन होता. इकडे भारतीय अर्थव्यवस्थेने कूस बदलून काही वर्षं झाली तोच आमची पिढी आताशा रांगायला लागली होती. हे रांगणं आमच्या अस्तित्वाचंच इनसेप्शन असावं बहुतेक.
पुढे काही महिन्यांनी चालायला लागलो त्यावेळी अंगणवाडी-बालवाडीचा प्रवास सुरु झाला होता. अश्यात अंगणवाडीतला खाऊ, सुगडी आणि आजारी पडल्यावर मिळणारी औषधं ही अगदी फुकट असतात याचं त्यावेळी कोण कौतुक वाटायचं! अर्थातच हे सगळं कुठून येतं आणि आपल्याला हे नेमकं कोण पुरवतं(?), हे कळण्याचं मुळातच काही कारण नव्हतं. अश्या एकूणच न कळत्या वयात आपण हळूहळू मोठे होत आहोत, हे नेणिवेच्या कुठल्याशा पातळीला त्यावेळी नक्कीच कळत असलं पाहिजे. नाहीतर उन्हाळ्याच्या दिवसांत गावभर हुंदडून गोळा केलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांच्या बदल्यात गारेगार मिळवण्याची किलोभर अक्कल आमच्या पिढीबांधवांना येती ना! शिवाय हा सगळा उपद्व्याप करताना गृहपाठातलं किरकोळ गणित जमलं नाही; म्हणून सोमरस प्राशन केलेल्या शिक्षकाने एखाद्या बालकोत्तमाच्या कानाखाली सोमजाळ काढायचेच दिवस होते ते! त्यात घरी तक्रार घेऊन जायला मुभा नसायचीच बहुदा.
मात्र कालांतराने वातावरणात एक प्रकारची फ्लेक्सिबिलिटी येत गेली. सोमजाळाच्या प्रयोगांना एकदमच खीळ बसली आणि खिचडीपर्व सुरू झालं. रोज दुपारी मिळणाऱ्या खिचडीमुळे का होईना; प्रथमच सरकार नावाची भानगड कळू लागली होती. मात्र तरीही मध्यान्न भोजनात हे लोक्स भाजी-पोळीच्या जागी खिचडीच का बरे देत असावेत, याचा थांगपत्ता लागला नव्हता. इतकंच नाही तर शाळेच्या भिंतीवर रेखाटलेल्या चित्रात एक मुलगा नि एक मुलगी त्या ‘सर्व शिक्षा अभियान’वाल्या पेन्सिलवर का बरं बसले असतील, याचाही उलगडा अजून झाला नव्हता.

शिवाय हे सगळे सो कॉल्ड बावळट प्रश्न पडण्याच्या काळात टीव्हीवर ‘स्कुल चले हम’ ची जाहिरात लागायची. ती पाहिल्यावर आपल्या शाळेत आणि या जाहिरातीतल्या शाळेत इतका ‘जमीनआसमान’सदृश्य फरक का बरे असावा(?) असाही विचार मनात येत असे.

अश्या एकूणच गाभूळलेल्या अवस्थेतून आमची पिढी एव्हाना बाहेर येत होती तोच गावात पहिल्यांदा टेलिफोन अँटेनाज उभे रहायला सुरुवात झाली.

हे सगळं गुऱ्हाळ एकीकडे सुरू असताना डोळे अवतीभवती होणाऱ्या बदलांना टिपू लागले होते आणि आमची ‘पोस्ट खाउजा’ पिढी मात्र अव्याहतपणे मोठं होण्याच्या आहारी गेली होती.

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.