माझा वाचनप्रवास: जागतिक पुस्तकदिनानिमित्त…!

इसवी सनाच्या 21 व्या शतकाचं तिसरं साल असेल कदाचित. मी बालवाडी सोडून गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दाखल झालेलो. फार काही कळण्याचं वय नव्हतंच मुळात. तरीही तिसरीच्या वर्गात गेल्यावर क्रमिक पुस्तकं आणि त्यांचा सहवास आवडायला लागलेला. त्यातून बऱ्याच वेळा परत परत एकच पुस्तक वाचायचा कंटाळा येत असे. त्यावर उपाय म्हणून मग दैनिक सकाळचं अगदीच गाजलेलं साप्ताहिक बालमित्र वाचायला सुरुवात केलीली. असंही आमच्या घरी दररोज वर्तमानपत्र येत असे. आजोबा आणि वडिलांनाही डेली पेपर वाचायची सवय होती. किंबहुना ती आजही आहे. तर अश्या प्रकारे बालमित्र पासून सुरू झालेला अवांतर वाचनाचा प्रवास एव्हाना चंपक पर्यंत येऊन पोचला; तोच गावात सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात झाली. नाव नृसिंह सार्वजनिक वाचनालय. फी वार्षिक पन्नास रुपये. त्यात हवी तेवढी पुस्तकं घरी घेऊन जायची मुभा. हे सगळं माझ्या निरलस मनाला त्यावेळी जाम भावलेलं. त्यात अवांतर वाचनाला घरी फुल्ल स्पेस होती. अश्या एकूणच भारलेल्या वातावरणात मी लघुकथा, लघुचरित्रं वाचायला लागलो होतो. त्यातून मिळणारा आनंद टीव्हीवरील कार्यक्रमांपेक्षा कैक पटींनी अधिक असायचा. कारण त्यात मला कमालीचं वैविध्य जाणवायचं.
पुढे माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलो तेव्हा वाचनाची पोकळी निर्माण झालेली. त्यात शाळेला स्वतःचं असं ग्रंथालयही नव्हतं. असं असल्यावर मुलं वाचणार तरी कुठून, म्हणा! एव्हाना, इकडे गावच्या सार्वजनिक वाचनालायलाही कुठल्याश्या कारणामुळं घरघर लागलेली. या तीनेक वर्षांच्या स्प्रिंटमध्ये मग मराठी दैनिकात दर रविवारी छापून येणाऱ्या सप्तरंग, मंथन, लोकरंग इ. वैचारिक ठेवण असलेल्या साप्ताहिक पुरवण्या वाचायला लागलो. यामुळे गोष्टी क्लिअर होत गेल्या. परंतु, फार काही कळू लागलं होतं, अशातला भाग नाही.
इकडे आठवीला सेमी इंग्लिशसाठी परत एकदा शाळा बदललेली. तेव्हा तिथे लायब्ररी आहे, असं कळल्यावर खूप आनंद झाला होता. मग वेळ मिळेल तसं वाचायला लागलो. त्यात शाळेने एक नविन उपक्रम सुरू केलेला. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या वाढदिवशी शाळेच्या ग्रंथालयाला किमान एक पुस्तक स्वेच्छा भेट म्हणून द्यायचं. असा तो उपक्रम. अर्थातच त्यातून फारसं काही प्रोडक्टीव्ह घडलं नाही. अलबत गमतीचा भाग म्हणजे लायब्ररीत पाककला, जनरल नॉलेज, विनोदसंग्रह टाईपच्या पुस्तकांची भर मात्र नक्कीच पडली होती.
असो, तर पुढच्या शैक्षणिक प्रवासासाठी वीसशे तेरा साली औरंगाबादेत येऊन पोचलेलो. तीन वर्ष शासकीय तंत्रनिकेतानात काढायला लागणार होती. डिप्लोमाचा हा काळ पुढे माझ्या वाचनासाठी सुवर्णकाळ ठरला. त्याचं कारण म्हणजे औरंगपुऱ्यातलं ‘बलवंत वाचनालय’.

बलवंत वाचनालय, औरंगपुरा, औरंगाबाद

लोकमान्य टिळकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन झालेलं हे ग्रंथालय जवळजवळ 100 वर्ष जुनं आहे. 72000 पुस्तकांचा खजिनाच आहे इथे! फी विचाराल तर तो महिन्याला 20 रुपये फक्त. सुरुवातीला सातशे रुपये डिपॉझिट केले की मग हवी ती पुस्तकं वाचायला मिळतात. अशा लायब्ररीमुळं बरंच वाचायला मिळालं. इकडे पॉकेटमनीतल्या पैश्यातूनही चांगली पुस्तकं संग्रही ठेवायची सवय लागलेली. आज माझ्याकडे जवळजवळ तीसेक पुस्तकांचा संग्रह असेल. अर्थातच हे सगळं मी मराठीत वाचायचो. इंग्रजीचा मुळातच फोबिया होता.
मग इंजिनियरिंगला आलो तेव्हा इंग्रजीवर कमांड मिळवायची, असं ठरवलं. एका वेल नोन इंग्लीश वृत्तपत्रापासून सुरुवात केलेली. सोबतीला एक हार्डकव्हर डिक्शनरीही बनवलेली. काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर; इंग्रजी पुस्तकं वाचली तर ती कळायला लागतील, इतकं इंग्रजी सुधारलं होतं. मग पुढं काय वाचायचं हा प्रश्न होता. असंही हवी ती इंग्रजी पुस्तकं आपल्याकडच्या लायब्ररीजमध्ये फारशी मिळत नाहीत. तेव्हा यावर उपाय म्हणून मग ई-बुक्सकडे वळलो. माझ्या मते, पुस्तकं कुठल्याही फॉरमॅट मध्ये असली तरी त्यांना वाचण्यात एक वेगळीच मजा असते. जे जग आपण पाहू शकत नाही, ते पुस्तकं आपल्याला दाखवून देतात. इतकं साधं सोप्पं गणित आहे!
असो, ब्लॉग फार लांबतो आहे. तूर्त इथेच थांबलेलं बरं! त्याआधी खाली काही पुस्तकांची यादी देतोय. जमलं तर वाचा. परत भेटूच.

सरतेशेवटी, जागतिक पुस्तकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

मराठी
1. ययाती– वि.स. खांडेकर
2. हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ– भालचंद्र नेमाडे
3. बारोमास– सदानंद देशमुख
4. गर्जा महाराष्ट्र– सदानंद मोरे
5. संभाजी– विश्वास पाटील

इंग्रजी
1. My experiments with truth– M. Gandhi
2. The alchemist– Paulo Coelho
3. 21 lessons for 21st century– Y.N Harari
4. The last girl– Nadia Mirada
5. Three thousand stitches– Sudha Murty

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.