ट्रॅव्हलर, मालवणी डेज आणि आम्ही सारे: भाग 4

दुपारचे अडीच वाजलेले. एकीकडे डोकं तापवणारं रखरखतं ऊन तर दुसरीकडे पाय भाजून सोडणारी मऊशार कोकणी रेती. एकूणच काय तर प्रचंड सुतकी वातावरण. अश्या परिस्थितीत समोर जर अथांग जलसागर दिसला तर कुणाही सर्वसाधारण माणसाचं जे होईल तेच आमच्या गँगचंही झालं.

तारकर्ली बीच

बहुतेक लोक्स पहिल्यांदाच समुद्र पाहत होते. त्या बहतेकांत मीही आलोच म्हणा! एरवी कोरड्या नद्या आणि शुष्क तलावं पहायची सवय झालेल्या माझ्यासारख्या मराठवाडी तरुणाला समुद्र म्हणजे एक प्रकारचं अफाटत्वच जणू! अश्या या अखंड जलसागरात कधी एकदा डुबकी मारतोय, असं व्हायला झालं. ग्रुपचं विचाराल तर कोणी पाण्यात उतरून व्हॉलीबॉल खेळत होतं, कोणाचं यथेच्छ समुद्रस्नान चाललेलं तर कोण वाळूचा किल्ला बांधत होतं. या सगळ्यांवर कडी म्हणून की काय; इकडे किनाऱ्यावर चार पाच लोक्स रोन्याला (रोहनला) वाळूत पुरत त्याची ‘द ममी’ करू पाहत होते. एकंदरीतच वातावरण हलकंफुलकं होतं.
थोडया वेळाने नखशिखांत भिजलेलं शरीर, मिठाळलेले ओठ आणि सागरी लाटांना भिडण्याच्या नादात फुटलेले गुढगे, असं थिजलेलं अंगांग घेऊन पाण्याच्या बाहेर पडलो तेव्हा साडेसहा वाजून गेले असतील. आकाशात सूर्य अस्ताला जात होता. आणि मावळतीस टेकलेल्या त्या दिप्तीतम तेजाला कवेत घेऊ पाहणारा सिंधु दुर्ग माझ्या पुढ्यात उभा होता. त्याचं हे आगळंवेगळं रूप पाहताक्षणी माझं मन अचानक सतराव्या शतकात जाऊन ठेपलं.

अस्ताला लागलेला सूर्य, सिंधुदुर्ग आणि संकेत. त्रिवेणी!

इसवी सनाचं 1664 वं साल असेल कदाचित. हिरोजी इंदलकर नावाचा तत्कालीन चीफ आर्किटेक्ट शिवरायांकडे किल्ला सुपूर्द करतोय. याप्रसंगी महाराज बेहद्द खूष आहेत. स्वराज्याला एक अभेद्य जलदुर्ग मिळाल्यामुळे इकडे मावळ्यांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. समुद्रपर्यटन निषिद्ध मानण्याच्या काळात आपला राजा धर्माची ही बेगडी बंधनं केवळ आपल्या रक्षणासाठी झुगारुन लावतोय, याचं रयतेला कोण कौतुक.
इकडे गडावर असा उत्साह संचारलेला असताना मी कधी 21 व्या शतकात येऊन पोचलो, माझं मलाही कळलं नाही. डोळे उघडले तर सूर्यास्त झालेला.

आता रिसॉर्टवर निघायची वेळ झाली होती. सगळ्यांनी चालत जायचं ठरवलं होतं. काजू, फणस, नारळ, आंब्याची झाडं आणि मालवणी घरं पाहत आम्ही रिसॉर्टच्या दिशेने चाललो होतो. तिथल्या घरांचे ते मोठमोठाले व्हरांडे, रस्त्यात भेटणारी ती मितभाषी कोकणी माणसं इ. गोष्टी आपसूकच नजरेस पडत होत्या. हे सगळं पाहत असताना एक लक्षात आलं ते म्हणजे तिथच्या जवळपास प्रत्येक घराच्या आवारात एक विहीर होती.

घरघुती मालवणी विहीर

प्रत्येकाच्या घरी विहीर! कसलं भारी! आमच्या भागात मात्र थेट उलटं आहे. मागच्या काही वर्षांपासून मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य तीव्रपणे जाणवू लागलं आहे. सार्वजनिक नळयोजनेची पुरती वाट लागलेली असताना बऱ्याच ठिकाणचे हातपंपही घरघरत आहेत. यावर तत्कालीन उपाय म्हणून लोक घरघुती बोअर्स/कूपनलिका घेतात. परंतु कमी पर्जन्यामुळे अलिकडे त्यांचंही पुनर्भरण होऊ शकेनासं झालं आहे. सबब, उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची जवळजवळ सगळी मदार टँकर्स वरतीच असते. अश्या परिस्थितीत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रात सध्या होत असेलेलं काम पथदर्शीच म्हणावं लागेल.
असो, तर इतका सगळा विचार करत आम्ही एव्हाना रिसॉर्टवर पोचलो होतो. आता आंघोळ करणं मस्ट होतं. पटापट शॉवर घेऊन बाहेर आलो तर सगळे जेवायला जाण्यासाठी रेडी होते. परत आशिष व्हेज नॉनव्हेज हॉटेलवर निघायला लागणार होतं.

इकडे मालवणी सीफूड खायच्या नुसत्या विचारानेच माझी भूक कितीएक पटींनी चाळवली होती.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.