ट्रॅव्हलर, मालवणी डेज आणि आम्ही सारे: भाग 3

किनारा रिसॉर्टसमोर आमची ट्रॅव्हलर व्हॅन थांबली तोच मगाचपासनं गाणी ओकत सुटलेला साऊंड एकदाचा सायलेंट झाला होता. त्याचं आपलं बरंय. स्विच टाकलं की वाजायला लागतो. मग इकडे गाणं कुठलंही आणि कोणीही गायलेलं असो, याला त्याचं काही सोयरंसुतक राहत नाही. या साऊंडसारख्या कैक वस्तूंकडे पाहिल्यावर त्यांच्या निर्जीवपणाचा हेवा वाटायला लागतो. निदान ही निर्जीव पामरं इतरांशी भेदभाव तरी करत नाहीत. अवघ्यांना अगदी समान न्याय लावून मोकळी होतात. समतेचं इतकं सरळसोट सूत्र आधुनिक जगात जगणाऱ्या आणि स्वतःला सजीव म्हणवून घेणाऱ्या माणसाला तरी गवसलंय का?

किनारा रिसॉर्ट, तारकर्ली बीच, मालवण

असो, तर किनारा रिसॉर्टच्या ऑफिसात जाऊन चेक इन वगैरे केल्यानंतर शॉवर लावून अंघोळ उरकली. आता जेवण जेवणं गरचेचं होतं. सलग चौदाएक तास प्रवास झाला होता. प्रचंड भूक लागली होती. सबब, म्हणून तर सगळ्यांनी पटापट अंघोळी उरकल्या होत्या. आता प्री प्लॅन्ड हॉटेलवजा कोकणी घरात जेवायला निघायचाच काय तो अवकाश बाकी होता.

आशिष व्हेज-नॉनव्हेज हॉटेल

त्या हॉटेलवजा हॉटेलमध्ये पोचलो, तेव्हा दुपारचे 12 वाजले असतील. समोर पाहिलं तर आशिष व्हेज-नॉनव्हेज हॉटेल असा मोठा बोर्ड लावलेला. मोठा ऐसपैस व्हरांडा. त्याच्या एकदम मध्यभागात किचनची एक छोटीशी टुमदार इमारत. अवतीभोवती नारळाच्या झाडांची रेलचेल. अंगणात कोकणी रेतीचा पडलेला सडा. पर्यटकांना पहुडण्यासाठी बांधलेले झोपाळे. शिवाय हॉटेलच्या आवारात जेवणासाठी टाकलेले टेबल्स आणि खुर्च्या. असं सगळं दिसत होतं. आपण कोकणातच आहोत ना(?) असा प्रश्नही एक क्षण मनाला चाटून गेला. त्याला याचं उत्तर मिळालं की नाही, माहीत नाही. पण मला आणि आमच्या सबंध डी.एस.ई गँगला आताशा खास रुचकर कोकणी जेवण मिळालं होतं.

मालवणी व्हेज थाळी

एव्हाना जेवणाची ताटं आमच्या पुढ्यात होती. अगदीच साधं परंतु तरीही स्वतःचं वेगळेपण जपणारं कोकणी जेवण म्हणजे आहाहा! अत्यंत लाजवाब! पोळी, भाजी, भात, वरण, पापड, कैरीचं लोणचं आणि या सगळ्यांवर कडी करणारी सोलकढी म्हणजे सो कॉल्ड कोकणी शाकाहार. कोकणी लोक्स बहुदा भात आणि मासे मोठ्या प्रमाणात खातात. सणवार न पाहता कोकणात नॉन व्हेज खायला मिळतं, हे काय कमी आहे! नाहीतर आपले घाटावरचे लोक पहा. आठवड्याचे जवळजवळ सगळेच वार बहुतेकांनी चक्क देवालाच देऊन टाकलेत. काय तर त्या दिवशी मांसाहार करायचा नसतो, म्हणे! मांसाहाराने प्राण्यांची कत्तल होते म्हणून ते वर्ज्य करणं, हे एकवेळ लॉगिकच्या सगळ्या लेव्हल्स तरी पाळतं. पण देवाला वार देणं, हे तद्दन मुर्खपणाचंच लक्षण म्हणावं लागेल. नाही का? माझं विचाराल तर नॉन व्हेज म्हटलं की, लागलीच तोंडाला पाणी सुटतं. ते खायला माझ्यासारख्या पट्टीच्या खवय्याला काळवेळ लागत नाही. आता हेच बघा ना! सुरुवातीला व्हेज वर बोलता बोलता मी नॉन व्हेजवर कधी लिहून गेलो, माझं मलाही कळलं नाही.

तर एकूणच कोकणी जेवण हे यमिष्ट भासलं. गुलाबी सोलकढीनं मात्र पहिल्या सीपमध्येच घात केला. ते म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे. असंही कधीही न टेस्टलेल्या/ऐकलेल्या/वाचलेल्या/ सोलकढीबद्दल माझं पूर्वानुमत असण्यास काहीच कारण नव्हतं. मला तर थेट हॉटेलवर गेल्यावरच कळलं होतं की, हे इथलं फेमस ड्रिंक आहे. मीही मग ताटात दिसणारं ते गुलाबी पेय जाम भारी असेल असं समजून पोटात रिचवलं तर चक्क उलटायला झालं. कित्ती लसूण टाकतात हे लोक्स यामध्ये! हाऊ कॅन इट बी अ फेमस ड्रिंक ऑफ कोंकण, असं व्हायला झालं! सगळ्या ग्रुपची तीच गत झाली होती. एव्हाना जेवणं उरकली होती. पोट मात्र सोलकढीच्या नावानं कुढत बसलं होतं.

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.