ट्रॅव्हलर, मालवणी डेज आणि आम्ही सारे: भाग 2

दि. 12/04/2019

थोड्या वेळापूर्वी गगनबावडा घाट उतरल्यावर गाडी थांबली तेव्हा एका हॉटेलात चहा बिस्कीटं खाऊन झालेली. तीही तोंड न धुता! बेडटी म्हणजे एक भन्नाट प्रकार असतो. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ब्रश न करता चहा घेण्यात जी मजा आहे, ती अगदीच युनिक म्हणावी लागेल.

असो, तर मगाशी चहा पिताना त्या हॉटेलसमोरील रस्त्यापलीकडे एक पडकी जुनी इमारत दिसलेली. दुरून पाहताना वाटलं की, जुनी नाट्यशाळा असेल. एव्हाना चहा पिऊन झाल्यामुळे तिकडे एक चक्कर मारून यायचं ठरवलं. मी आणि सपकाळ आमचे मोबाईल घेऊन गेलो आणि दोघेही इमारतीबाहेरील गंजलेली लोखंडी पाटी पाहून थबकलो. अरेच्चा व्हायला झालं! मुदलात ती एक जुनी शिक्षण संस्था होती. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था.

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेची भग्न इमारत

तिचे भग्नावशेषच काय ते बाकी होते. आज महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थांची झालेली दुर्दशा पाहून जुन्या पिढीतल्या समाजधुरीणांनी कौटुंबिक त्यागातून उभारलेल्या यांसारख्या संस्थांचं अप्रूप वाटायला लागतं. डोळ्यासमोर आपसूकच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, टिळक, आगरकरांपासून ते कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्व्यांपर्यंतचे ज्ञानऋषी उभे ठाकतात. साद घालतात. या महात्म्यांच्या अशा कैक ज्ञानमंदिरांनी इथिकली कमीटेड असलेल्या कितीएक पिढ्या घडवल्या. प्रत्येक क्षेत्रात मेरूमणी उभे केले. प. महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्था असो की मराठवाड्यातील म.शि.प्र मंडळ असो; इत्यादींनी आजवर केलेलं ज्ञानकार्य पृथ्वीमोलाचंच म्हणावं लागेल. हे असं असलं तरी वर्तमानात या नामवंत संस्थांना लागलेली कमर्शिअल राजकीय हस्तक्षेपांची कीड, हे आपल्या समाजाचं सामुहिक अपयशच म्हणावं लागेल.

संस्थेच्या आवारात

असो, तर त्या संस्थेच्या आवारात थोडा वेळ बसल्याने नकळत किल्लेधारूरच्या झेडपी शाळेत शिकतानाचे दिवस आठवले. थोडंसं हायसं वाटलं. फोटोज काढले. तितक्यात कृष्णाचा कॉल आला. आता पुढच्या प्रवासाला निघायला लागणार होतं.

प्रवास चालूच होता तोच कणकवली आलं. मालवण तर आता खूप थोड्या अंतरावर राहिलेलं. तासाभरात आम्ही तिथे पोचणार होतो. ऍज युजुअली इकडे ट्रॅव्हलरमध्ये निस्ता धांगडधिंगा चालू होता. मी मात्र कणकवली शहर पाहण्यात दंग होतो. अर्थातच कणकवलीबद्दल लिहावं असं काही विशेष जाणवलं नाही. एव्हाना शहरातून राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू असलेलं नजरेस पडलं. सबंध महाराष्ट्रभर रस्त्यांची कामं तुफान वेगानं होत्साता दिसत आहेत. बाकी काही असो, गडकरी नावाच्या रस्तेकऱ्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे! हल्ली एकूणच राष्ट्रीय राजकारण गंडलं जाण्याच्या काळात अशी काही माणसं कमालीचा आशावाद देऊन जातात. म्हणूनच सतत असं वाटतं की, प्युअर नकारात्मक किंवा शुद्ध होकारात्मक असं काही नसतंच मुळी. चहूकडे असते ती सरमिसळ. फक्त सरमिसळ! हे जग आपल्याला ग्रे शेडमध्ये पाहता आलं पाहिजे, बस्स! आता कोकणाचंच उदाहरण घ्या ना. घाटमाथ्यावरच्या लोकांना या भागास उपजतच मिळालेल्या निसर्गसौंदर्याचा सदोदित हेवा वाटत राहतो. पण हाच निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा काय आक्रीत घडतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणूनच तर चांगलं आणि वाईट हे बहुदा एकत्र नांदत असावेत.
आताशा आम्ही मालवणात पोचलो होतो. बहुतेक त्यादिवशी आठवडी बाजार असावा. सोबतीला अरुंद शहरी रस्ता. रस्त्याच्या कडेला जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला इ. विकणारी मालवणी माणसं. आणि त्याच्या मध्यातून हॉर्न वाजवत जाणारी आमची ट्रॅव्हलर. हे सगळं भूक चाळवणारं होतं.

मालवणी मार्केट

असं असताना कधी एकदा रिसॉर्टवर अंघोळून जेवण करतोय, असा विचार मनात येणार तोच आमची ट्रॅव्हलर व्हॅन परत एकदा थांबली होती.

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.