ट्रॅव्हलर, मालवणी डेज आणि आम्ही सारे: भाग 1

जिप्सी सोल असणाऱ्या तरुणतुर्काला भटकंतीसाठी कारणं लागत नाहीत. मूड झाला की कधी एकदा या शहरी कोलाहलातून बाहेर पडतोय, असं व्हायला होतं. शिवाय इकडे इंजिनियरिंगचाही केवळ एक महिना बाकी. त्यात अलरेडी ग्रुपमध्ये कुजबुज सुरू झालेली. एव्हाना कुजबुजेचं रूपांतर चर्चेत कधी झालं, कळलंसुद्धा नाही. विषय काय(?) तर ग्रुप टूरला गेलं पाहिजे. झालं! कोकणात मालवणला जायचं ठरलं. तीन दिवस चार रात्री असा प्लॅन आखून झाला. बॅकपॅकिंगही झाली. आता फिरस्तीला निघण्याचाच काय तो अवकाश होता. पहिल्यांदाच कोकणात जाणार असल्यामुळे माझ्या मनात समुद्रासोबतच तिथल्या समाजजीवनाविषयीही प्रचंड उत्सुकता होती. तिथले लोक काय खातात? काय प्रकारचे कपडे घालतात? त्यांचा स्वभाव काय? त्यांच्या बोलीभाषेत मुदलातच असलेलं वेगळेपण ते नक्की कोणतं? याबद्दल पूर्वी भरपूर ऐकलं आणि वाचलं होतं. आता ते पहायलाही मिळणार होतं. एकूणच काय तर कोकणात जायच्या विचारानं खूप भारी फील होत होतं.

दि. 11/04/2019

कॉलेज सुटून संध्याकाळचे साडेसहा वाजलेले. पंधरा ग्रुपिस्ट लोक्स आणि ट्रॅव्हलर व्हॅन तयारीतच होते. आणि एकदाची प्रवासाला सुरुवात झाली. एव्हाना अ.नगर ओलांडून आमची व्हॅन खूप पुढे आली होती. अंताक्षरीच्या धुंदीत कधी दहा वाजले कळलं नाही. एका हॉटेलवजा धाब्यावर जेवणं उरकली आणि परत पुढच्या प्रवासाला निघालो.

रात्रीचा प्रवास किती मोहक असतो, नाही! गाडीची खिडकी उघडी ठेवल्यावर आत येणारी वाऱ्याची झुळूक आपल्याला सतत साद घालत असते. आपण तिला फक्त प्रतिसाद घालायला उशीर; एक आगळावेगळा संवादच उभयतांत सुरू होतो जणू! वाऱ्याच्या त्या शालीन झुळकांशी छान हितगुज चालू असताना कधी झोप लागली, कळलंसुद्धा नाही. जाग आली तेव्हा गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती.

गुगल मॅपवर पाहिलं तर आम्ही पुणे जिल्ह्यात होतो. रात्रीचे दीड वाजलेले. बाजूलाच चहाची टपरी दिसत होती. बहुतेक ड्रायव्हरकाकांना चहाची तल्लफ झालेली असावी, असं मला वाटलं. माझं विचाराल तर रात्रीचा चहा म्हणजे माझ्यासाठी निखळ स्वर्गसुखच! कसलाही विचार करायच्या आत गाडीतून खाली उतरलो. मग समजलं की, चहा घेण्यास ड्रायव्हरकाकांसोबतच अर्धी अधिक डी.एस.ई गँग उत्सुक आहे (डी.एस.ई म्हणजेच डायरेक्ट सेकंड इयर. सोबतच डी.एस.ई गँग हे आमच्या व्हॉट्सऍप ग्रुपचं टायटल आहे). चहा घेऊन झाल्यानंतर टपरी मालकाशी थोड्याफार गप्पा चालल्या. साठेक वर्ष वय असेल त्यांचं. इतक्या रात्री टपरी चालू ठेवण्याच्या त्यांच्या कामसूपणाचं कुतूहल वाटलं. याचमुळे असेल कदाचित; कष्टास चटावलेली माणसं नेहमीच सुखी दिसतात.

इकडे आमच्या व्हॅनने परत एकदा मजला कापायला सुरुवात केली होती. दोनेक तास गाडीत नुसता धिंगाणा चालू होता. मग झोप. परत जाग.

दि. 12/04/19

सकाळचे सहा वाजलेले. बाहेर पाहिलं तर कोल्हापूर दिसतंय. रंकाळ्याशेजारून आमची ट्रॅव्हलर धावतेय. रंकाळा पहिल्यांदाच पाहत होतो. ज्ञानेश्वर मुळेंच्या ‘माती, पंख आणि आकाश’ या पुस्तकात सर्वप्रथम रंकाळ्याचं वर्णन वाचलेलं. आज उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. आपण जे वाचतो ते पाहतो? की पाहतो ते वाचतो? की दोन्ही नाही? हे समजायला मार्ग नाही. आणि यावर अधिक विचार करण्यात काही अर्थही नाही. जाऊ देत. आपण आपलं रंकाळ्यासारखं अथांग जगत रहायचं.

असो, तर मी कुठे होतो? हं. एव्हाना गाडीच्या खिडकीतून दिसणारं कोल्हापूर मला जाम भावलं होतं. त्या जुन्या इमारती. ते मोठमोठाले रस्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा या शहराला मिळालेला इमोशनल टच. असं मोहक कोल्हापूर पार करून आम्ही आताशा गगनबावडा घाटात पोचलो होतो. इतका भव्य घाटरस्ता मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो.

एव्हाना घाट संपला होता आणि माझ्या मनात विचारांची कैक आवर्तं उठली होती. एकूणच हा सह्याद्री म्हणजे कितीएक शतकांपासूनचा एक थोर पर्वतपुरुष असला पाहिजे, असा विचार मनात तरळून गेला तोच आमची ट्रॅव्हलर व्हॅन अचानक थांबली.

क्रमशः

One Comment Add yours

  1. नक्की अभिप्राय कळवा!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.